Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर पालिका आयुक्तांनी घेतला आढावा; दिले 'हे' आवाहन
यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भूषण गगराणी यांनी जुहू चौपाटी आणि वेसावे चौपाटी आदी ठिकाणी पाहणी केली. गणेशोत्सवानिमित्त विविध स्तरावर पूर्वतयारी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता, विसर्जन मार्गावरील वृक्षछाटणी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, असे गगराणी यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वी जाहीर केली आहेत. त्या ठिकाणी पोलिसांबरोबर समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी. मुख्य रस्त्यांसह लहान रस्ते, गल्ली बोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती आदी ठिकाणी स्वच्छता ठेऊन कचरा संकलन आणि वाहतूक फेऱ्यांची वारंवारता वाढवावी, असे आदेश गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, कृत्रिम तलाव, वाहन आधारित फिरते कृत्रिम तलाव, निर्माल्य वाहक फिरते वाहन, विसर्जन स्थळावरील कार्यरत स्वयंसेवक, पेयजल, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे, निर्माल्य कलश आदींचा गगराणी यांनी आढावा घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवकाळात सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष द्यावे.
उत्सव कालावधीत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी अधिक कार्यतप्तर आणि सजग राहावे. भाविक, नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, जीवरक्षकांची नेमणूक, सार्वजनिक स्वच्छता याकडेही यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.